Tuesday, May 31, 2016

'सैराटच्या' निमित्ताने

एक साधू एका गावच्या नदीकाठच्या मंदीरात वास्तव्यास असे. दररोज सकाळी एक गवळण नदी पार करून मंदिरात दुध पोहोचवण्यासाठी येत असे. कधी कधी तिला साधुबाबांच्या प्रवचनाचाही लाभ व्हायचा. एकदा साधुबाबा म्हणाले की, ' जर आपण मनोभावे परमेश्वराचे स्मरण केले आणि स्वतःला त्याच्या ठायी अर्पण केले तर परमेश्वर आपल्या मदतीसाठी कुठेही धावून येतो'. गवळणीला साधुबाबाचे हे वाक्य लक्षात राहिले. एकदा त्यागावात धो-धो पाउस कोसळला. नदीला महापुर आला. गवळणीला नदी पार करून घेउन जायला कुठलाच नावाडी तयार होइना. पण गवळण साधुबाबासाठी दुध घेवून मंदिरात हजर होते. साधुला प्रश्न पडतो कि गवळण नदी पार करून कशी आली. साधू तिला याबाबत प्रश्न विचारतो. गवळण उत्तरते - "आपणच म्हणाला होता कि,  मनोभावे परमेश्वराचे स्मरण केले तर परमेश्वर आपल्या मदतीसाठी कुठेही धावून येतो. मी माझ्याकडे असलेली हि चटइ पाण्यावर टाकली. डोळे बंद केले आणि परमेश्वराला स्मरुण म्हटले या चटइ वरून मला पैलतीरी घेउन चल. आणि मी इथवर आले. आपण किती विद्वान आहात."
मतीतार्थ हा कि, कधीकधी आपल्या दररोजच्या जीवनातील सामान्य माणसे सुद्धा विद्वानाला जमणार नाही असे असामान्य कार्य करून जातात.



सध्या 'सैराट' हा मराठी सिनेमा सगळ्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे अगदी NDTV या हिंदी-इंग्रजी चॅनलने तसेच परदेशी प्रसार माध्यमानेसुद्धा याची दखल घेतली आहे. हा सिनेमा तसा वेगळ्या धाटनीचा बनलाय. ग्राम्य पार्श्वभुमी असलेल्या 'आर्ची' आणि 'परश्याची' ही कहानी आणि त्यातील इतर पात्रे. न याच्यात कोणी मोठा कलाकार आहे ना कोणी मोठे नाव. दररोजच्या जगण्यातील पात्रे आहेत आणि दररोजच्या धावपळीत भेटतील असे चेहरे आहेत. ग्रामिण भागात असलेले राजकारणी प्रस्त, ग्राम्य भाषा, तेथील क्रिकेटचे सामने, व्यवसाय (सायकलचे दुकान), विहीर, परश्याचे दिलदार मित्र, मित्रांमध्ये असलेली टोपन नावे... सगळे काही जशेच्या तसे मांडण्याचा प्रयत्न 'नागराज मंजुळे'ने केला आहे .



याअगोदर नागराजने 'पिस्तुल्या' हा लघुपट आणि 'फँड्री' हा चित्रपट बनवला होता. दोन्हींचे तेवढेच कौतुक झाले होते. असे ऐकले आहे कि, नागराजने सैराटच्या कलाकारांना केवळ 'संवाद' आणि 'कथानक' दिले आणि बाकी सर्व त्यांच्यावर सोडून दिले. या कलाकारांची पुर्वीची अभिनयाची पार्श्वभुमी नसल्याने त्यांनी फुकाचा अभिनय केलाच नाही. आपल्या दररोजच्या वागण्या-बोलण्यातला नैसर्गिकपणा त्यांनी त्यात आणला. त्यांना ते कृत्रीमरित्या, आव-आणून करावे लागले नाही कारण नाटकीय-अभिनय काय असतो हा प्रकारच त्यांच्यासाठी नवीन होता. यामुळे 'नजरेतला अभिनय', 'पहाडी संवाद', 'Larger than Life' प्रतीमा असलेला आणि दहा-दहा गुंडांना एकट्याने लोळवणारा नायक इथे दिसत नाही, दिसतो तो हातपंपातून पाणी भरणारा, नजर चुकवून क्रिकेट खेळणारा, वेळप्रसंगी हातगाडीवर काम करणारा निरागस परश्या. त्याच्या मित्रांचेही तसेच .कोणीही चारचाकितून अचानक रात्री गोव्याला घेउन जायला येणारा  इथे कुणी नाहिये (संदर्भ - दिल चाहता है). मळकट कपडे, मावा खाउन किडलेले दात, दररोजच्या अर्थार्जनासाठी चालवावे लागलेले पंक्चरचे दुकान... सगळे कसे आजुबाजुला घडते आहे असे वाटावे.  आर्चीची भुमिकाही तितकीच नैसर्गिक आहे. बुलेट,ट्रॅक्टर चालवणारी, खो-खो खेळणारी, विहीरीत पोहणारी निरागस,अल्लड आर्ची रिंकू राजगुरुने चांगली रंगवली आहे (त्यासाठी तिला पुरस्कारही मिळाला आहे.) अजय-अतुल ने 'झिंगाट'च्या तालावर परदेशातही लोकांना नाचवले आहे. त्यांनी पाश्चात्य संगितात लोकप्रिय असलेल्या Symphony चा प्रयोग चित्रपटात केला आहे. संवादात आजीबातच जड भाषेचा प्रयोग केलेला नाही त्यामुळे फारच काळजीपुर्वक न ऐकता ते सहज घेता येतात (नाहीतर ' जिंदगीमे कुछ चिजे फायदे और नुकसानसे उपर होती है। लेकीन कुछ लोग इसे नही समझते'  (संदर्भ - 'त्रिशुल' चित्रपट) हा Dialog जरा कान देउनच ऐकावा लागतो.) कथानक मध्यांतरानंतर जरा करुण (Sentimental) होते पण ते एका सत्य घटनेवर (Honor-Killing) आधारीत आहे असे ऐकले.

बच्चन साहेबांनी सांगितलेली  एक गोष्ट इथे नमुद कराविशी वाटते, ते म्हणतात 'Indian Cinema portrays Escapism and believe in Poetic-Justice' (भारतीय चित्रपट पलायनवाद दर्शवतात आणि काव्यत्म न्यायावर आधारित असतात). याचा अर्थ असा कि, प्राप्त परिस्थीतीतून भारतीय मनाला कमीत कमी ३ तासांसाठी सुटका हवी असते त्यामुळे जे सत्यात येउ शकत नाही अशा गोष्टी भारतीय मन पडद्यावर पाहते. त्यात त्याला शेवटी चांगल्याचा/सत्याचा  वाइटावर/असत्यावर विजय झालेला हवा असतो. (पण चांगल्याचा/सत्याचा विजय शेवटीच का होतो? अगोदरच का नाही? हे न सुटलेले कोडे आहे). बऱ्याच जणांना या चित्रपटाचा शेवट हृ्दयद्रावक वाटतो. पण कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही भयाण असते (At times reality is much STRANGER than fiction). ते स्विकारायलाच लागते.

काही महिन्यांपुर्वी 'Taxi' या इराणी चित्रपटाला एका 'Film Festival' मध्ये मानाचा पुरस्कार मिळाला. इराणमध्ये माध्यमांवर बरीच बंधने आहेत त्यामुळे 'जफर पनाही' या निर्मात्याने हा चित्रपट HandyCam ने चित्रित केला. त्याची VCD बनवून त्याने छुप्यामार्गाने पॅरिसला पाठवून दिली. तेथील 'Film Festival' मध्ये त्याला पुरस्कार मिळाला. हा चित्रपट पुर्णपणे Taxi मध्येच चित्रित होतो. त्यात प्रवास करणाऱ्या कुणालाही हे चित्रीत होत असल्याची जाणीव नव्हती त्यामुळे चित्रपट आजीबात कृत्रीम वाटत नाही.




वरिल कहानीतील गवळणीप्रमाणे कधी-कधी सामान्य माणसांकडुनसुद्धा असामान्य काम घडते. सैराट त्याचे एक उदाहरण आहे. यातील कलाकारांमागे कुठलेही वलय (Stardom) नाही, अभिनयाच्या शाळेतील नाटकीपणा (Artificialness) नाही तरीही जनमनाचा ठाव घेणारी एक कलाकृती त्यांनी तयार केली आहे. तद्द्न गल्लाभरु (BoxOffice) मसालापटापेक्षा वेगळ्या धाटणीचे आशयप्रधान (content-based) आणि वास्तववादी (Realistic) चित्रपट पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षक प्रगल्भ होत आहे. सैराट त्या मार्गावर एक चांगला प्रयोग ठरो !!! 

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया जरुर नोंदवा)